कोल्हापूर: संख्याशास्त्र हा विषय विज्ञान व तंत्रज्ञानाशी निगडित आहेच, पण त्याबरोबरच ती एक कला सुद्धा आहे, या दृष्टीने विद्यार्थ्यांनी त्याकडे पाहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातर्फे आज विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात पीएम-उषा पुरस्कृत ‘वास्तविक समस्यांचे सांख्यिकीय अन्वेषण’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यावेळी उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन तसेच त्यानंतर झालेल्या प्रथम सत्रात संबोधित करताना कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.
संख्याशास्त्र या विषयामध्ये करिअरच्या अनेक संधी असून संख्याशास्त्रज्ञांना विविध क्षेत्रांत उज्ज्वल भवितव्य असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिकलेल्या प्रत्येक सिद्धांताचा आयुष्यात कोठे ना कोठे उपयोग होतोच. विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि आकलन यापलिकडे जाऊन त्याच्या उपयोजनाच्या अनुषंगाने विचारचिंतन करण्याची आवश्यकता आहे. विषयात पारंगत होण्यासाठी आधी चांगला श्रोता बनण्याची सवय लावून घ्यावी. आपल्यासमोर केवळ माहितीचा संच आला, तरी त्या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्षापर्यंत कसे पोहोचावयाचे, ही एक कला आहे. सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या युगात डेटा विश्लेषणाला मोठेच महत्त्व आले आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण शिकण्याला आणि कौशल्य विकासाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे.
आपल्या व्याख्यानामध्ये कुलगुरूंनी संख्याशास्त्राच्या इतिहासातील अनेक रंजक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना विषय सोपा करून सांगण्यावर भर दिला.
यानंतर संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांचेही व्याख्यान झाले. यावेळी ‘माझे संख्याशास्त्र, माझे जीवन’ हा संवादात्मक कार्यक्रम झाला. यामध्ये ज्यांनी संख्याशास्त्रात यशस्वी कारकीर्द घडविणाऱ्या अधिविभागाच्या प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी मुलाखती रंगल्या. अंतिम सत्रात शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र शिक्षक संघटना (सुस्टा) यांच्या संयुक्त विद्यमाने बी.एस्सी. (भाग ३)च्या सांख्यिकीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सार्वजनिक आरोग्यामधील सांख्यिकीय अंतर्दृष्टी’ या विषयावर प्रकल्प सादरीकरण स्पर्धा झाली. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील प्राथमिक फेरीमधील एकूण ११ प्रकल्पापैकी पाच प्रकल्पांचे सादरीकरण झाले.
या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठासह कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या कार्यक्षेत्रातील संख्याशास्त्राचे शिक्षक आणि बी.एस्सी. (भाग ३) मध्ये शिकणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यशाळेचे स्वागत व परिचय डॉ. एस. व्ही. राजगुरू यांनी करून दिला. डॉ. महाडिक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. टी.जी. गोडसे यांचा उत्कृष्ट संशोधक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. सोमनाथ पवार यांनी आभार मानले. कार्यशाळेस नाशिक विभागाच्या सांख्यिकी सहसंचालक डॉ. सरिता यादव, डॉ. ए.ए. कलगोंडा, डॉ. प्रकाश चौगुले, डॉ. संतोष सुतार, डॉ. एस. के. गांजवे, डॉ. एस. एम. पाटील, डॉ. पी.वाय.पाटील, डॉ. एन. एच. जाधव, डॉ. पी. एस चौगुले, डॉ. व्ही. व्ही. कोष्टी, डॉ. ए. व्ही. दोरूगडे, डॉ. एस. के. पोवार, डॉ. आर. एच. वळीव, डॉ. (सौ.) एस. पी. पाटील आदी उपस्थित होते.