कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या गोकुळने प्रतिदिनी २० लाख लिटर्स दूध संकलनाचा संकल्प केला असून लाखो दूध उत्पादकांच्या सहकार्याने गोकुळने १७ लाख लिटर्स दूध संकलानाचा टप्पा पार केला आहे. दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळ दूध संघाचा मुख्य कणा असून दूध उत्पादन वाढीसाठी संघाने विविध योजना, सेवा सुविधा दूध उत्पादकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. 1
गेल्या चार महिन्यापासून राज्यातील गाय दूध खरेदी दारामध्ये सतत घसरण सुरु असून गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २५ रुपये पर्यंत खाली आले असतानाही गोकुळने दूध उत्पादकांच्या हिताचा विचार करून गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर ३३ रुपये इतका स्थिर ठेवला आहे. शासनाने गाय दूध खरेदीसाठी प्रतिलिटर रुपये ५ इतके अनुदान जाहीर केले असले तरी गोकुळकडून सध्या देण्यात येणाऱ्या गाय दूध खरेदी दरामध्ये कोणतीही कपात करण्यात येणार नसल्याचे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.
पुढे बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, सध्या शासनाने दि.११/०१/२०२४ ते १०/०२/२०२४ या कालावधीत गाय दूध पुरवठा करणाऱ्या राज्यातील गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. यासाठी राज्यातील खाजगी व सहकारी दूध संघानी ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. करिता किमान प्रतिलिटर २७ रुपये दर देणे शासनाने बंधनकारक केले आहे.
सध्या गोकुळचा गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. करिता प्रतिलिटर ३३ रुपये इतका असून तो शासनाने निर्धारित केलेल्या दरा पेक्षा प्रतिलिटर ६ रुपये इतका जादा आहे. थोडक्यात गोकुळचा गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर ३३ रुपये व शासनाकडून मिळणारे ५ रुपये अनुदान असा एकूण ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. करिता प्रतिलिटर ३८ रुपये इतका उच्चांकी दर दि.११/०१/२०२४ ते १०/०२/२०२४ या कालावधीत गोकुळला दूध पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना मिळणार असून हा राज्यातील उच्चांकी दर आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात संकलित होणारे गायीचे दूधा पैकी प्रतिदिनी जवळपास ७ लाख लिटर इतके दूध गोकुळकडून संकलित केले जात असून शासनाकडून मिळणारे ५ रुपये अनुदान हे थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा होणार असून या अनुदानापासून गोकुळ संलग्न कोणताही गाय दूध उत्पादक वंचित राहू नये म्हणून गोकुळमार्फत युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरु आहेत.
शासनाने घातलेल्या नियम व अटींचे परिपत्रक गोकुळमार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात आले आहे. याबाबत प्राथमिक दूध संस्थानीही शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे आवश्यक माहिती गोकुळच्या ई-मिल्क सुविधा या मोबाईल अॅपमध्ये दररोज भरावी असे आवाहन चेअरमन डोंगळे यांनी केले.
सध्याच्या स्पर्धात्मकबाजारपेठेत काही खासगी संस्था दूध उत्पादकांना जादा दराचे आकडेवारी सांगत आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र गोकुळ दूध संघाचा दूध खरेदी दर हा नेहमीच इतरांच्या तुलनेत जादा राहिला आहे. दूध उत्पादकांची गोकुळला साथ आणि गोकुळचा दूध उत्पादकांवर विश्वास हे सूत्र कायम आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफसो, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटीलसो व आघाडीचे सर्व नेते मंडळी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात राबविलेल्या सभासद हिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार व सर्व संचालकाचे बहुमोल सहकार्याने तसेच दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी यांच्या योगदानाने गोकुळ’ची दिमाखात वाटचाल सुरु असून कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांची पहिली पसंती गोकुळलाच आहे, आणि भविष्यातही राहील असे सांगितले.