” शाहू लोकरंग” महोत्सवातून पारंपरिक वाद्ये,लोकसंगीताचा गजर……

कागल (प्रतिनिधी) : काळाच्या ओघात पारंपरिक वाद्यांचा आवाज दुर्मिळ होत चाललेला आहे.परंतु कागल येथे आयोजित केलेल्या “शाहू लोकरंग” महोत्सवातून कोल्हापूरच्या स्थानिक कलाकारांनी “ताल उत्सव ” च्या माध्यमातून पारंपरिक वाद्ये व लोकसंगीत यांचा समन्वय साधत पारंपरिक वाद्ये ही बोलू शकतात ही नवकल्पना उपस्थितांमध्ये रुजवली. निमित्त होते, शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित “शाहू” महोत्सवाचे.

तबला,सुरपेटी,सनई दिमडी,झांज, ढोलकी,संबळ हालगी,चौंडके,तुनतुने अशा एकापेक्षा एक सरस वाद्यांच्या वादनाने कागलकरांना अक्षरशः घायाळ करत संगीताच्या तालावर रसिकांना ठेका धरायला लावले. खचाखच भरलेल्या जनसमुदायाने शिट्यांच्या, टाळ्यांच्या गजरात या लोककलेचा मनमुरादपणे आस्वाद लुटला.

 विशेष म्हणजे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी ज्या कलेला राजाश्रय दिला त्या  कलेला  त्यांचे पणतू आणि शाहू गृपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे व सौ.नवोदिता घाटगे यांनी  कलाकारांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
 
शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवातून पुढे आलेल्या 25 वर्षाखालील 25 युवकांनी कोल्हापूर येथील " ऋषम प्रस्तुत ताल-उत्सव - जेथे वाद्ये बोलतात "या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कलेला नवसंजीवनी मिळवून देत आहेत. आजमितीस  महाराष्ट्रामध्ये  यांचे 22 प्रयोग झाले  असून ही वाद्यसंस्कृती जोपासण्यामागे सुरू असलेली त्यांची धडपड निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. या कलाकारांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात अभंग, वासुदेव,भारुड,पोवाडा, धनगरगीत, नंदीबैल, लावणी अशा विविध पारंपरिक गीतांचा धरलेला फेर लक्ष्यवेधी ठरला.

तबला विशारद सुनील देशमाने म्हणाले,
महाराष्ट्राला पारंपरिक वाद्यांची, संगीताची फार मोठी परंपरा आहे.पारंपरिक वाद्ये संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. डीजे आणि बँडने आज तरुणाईला मोठ्या प्रमाणात भुरळ घातली असली तरी महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राला उंचीवर नेऊन ठेवलेली जुनी पारंपरिक वाद्ये आज कालबाह्य होत आहेत. जुन्या वाद्यांच्या स्वरांचा हा अनमोल ठेवा आम्ही वृषम ताल-उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवत आहोत.

स्व.राजे विक्रमसिंह घाटगे माझ्यासाठी ऊर्जास्त्रोत

भरतनाट्यमचे उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या संयोगिता पाटील म्हणाल्या,स्व.राजे विक्रमसिंह घाटगे माझ्यासाठी ऊर्जास्त्रोत आहेत .ज्यावेळी आमच्या घरची परिस्थिती हलाखीची होती . त्यावेळी त्यांनी मला अनुदान देऊन प्रोत्साहन दिल्यानेच मी राज्यस्तरापर्यंत चमकु शकले.या निमित्ताने स्व.राजेंचे स्मरण झाले.