कोल्हापूर प्रतिनिधी : भारतातील दुग्धव्यवसाय आणि इथल्या कृषी संस्कृतीमुळेच ग्रामीण अर्थव्यवस्था शाश्वत बनली आहे. पण दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर बनवण्यासाठी आणि जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी त्यामध्ये आधुनिक साधनांचा वापर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. चेतन नरके यांनी केले. आंतरराष्ट्रीय डेअरी महासंघाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित जागतिक डेअरी शिखर संमेलनातील तांत्रिक परिषदेत “डेयरी उद्योगातून निर्माण झालेले ग्रामीण भागातील पर्यावरणपूरक आणि शाश्वत अर्थचक्र” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जगभरात या क्षेत्राकडे संपूर्ण व्यवसायिक दृष्टीकोनातून पहिले जाते. त्यामुळे दुधाचा प्रती लिटर उत्पादन खर्च कमी आहे. प्रक्रिया उद्योग आणि उपपदार्थ निर्मिती मधून जगभर बाजारपेठ निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत.पण यासोबत शेणामधील मिथेन मुळे निर्माण होणाऱ्या आणि इतर पर्यावरणाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. याउलट भारतात प्राचीन काळापासून या व्यवसायाला कृषी संस्कृतीशी जोडून लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचा भाग बनवले. निर्माण होणाऱ्या समस्यांचे समाधान भारतातील कृषी संस्कृतीत मिळत गेले.
भारतामध्ये हजारो वर्षापासून पशुधन आणि कृषी संस्कृती मधूनच जगाला आकर्षित करणारी समृद्धी आणि एक शाश्वत अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. इथल्या शाश्वत अर्थचक्रात मानवी मुल्ये, पर्यावरणाचे रक्षण, आदर्श समाजव्यवस्था आणि परस्परपूरक अशा समाजजीवनाची बीजे लपली आहेत. भारतात या व्यवसायातील ७०% जबाबदारी या महिला घेतात. त्यामुळे महिला आत्मनिर्भर बनण्यात त्यांचे सबलीकरण आणि महिलांचे सामाजिक नेतृत्व निर्माण करणे गेली हजारो वर्षे या उद्योगामुळे शक्य झाले आहे. मागील काही वर्षात जेंव्हा जेंव्हा जगाला मंदीचे चटके बसत होते तेंव्हा भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्याची झळ बसली नाही याचे प्रमुख कारण इथल्या पशु पालन आणि कृषी संस्कृतीत दडले आहे.
डेअरी उद्योगातील प्रत्येक घटक हा अर्थव्यवस्थेला हातभार लावतो. अगदी नैसर्गिक अथवा कृत्रिम रेतन, वासरू संगोपन, आरोग्य सेवा, पशु खाद्य, वैरण निर्मिती, गोठा व्यवस्थापन, दूध आणि दुधापासून निर्माण होणारे असंख्य उपपदार्थ अगदी गोमूत्र आणि शेण सुद्धा आर्थिक स्त्रोत निर्माण करतात. भारतात सुरवातीपासूनच शेण आणि मूत्राचा वापर हा शेती साठी होत असल्याने समस्येचे रुपांतर संधीत झाले आहे. फार पूर्वीपासून गोमुत्र आणि गोमयाचा औषधे आणि धार्मिक कार्यात वापर होत आहेच त्यासोबत शेणाचा वापर शेती, खते, हस्तकला, इंधन यासाठी होताच पण अलीकडच्या काळात वीज निर्मिती साठी देखील वापर होऊ लागला आहे. याकारणाने भाकड जनावरे देखील अगदीच निरुपयोगी ठरत नाहीत. थोडक्यात ग्रीन डेअरी हि संकल्पना भारतात सुरवातीपासूनच पासून अस्तित्वात आहे.
या क्षेत्राचे संघटीत स्वरूप जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला हातभार लावून ग्रामीण अर्थव्यवस्थेत एक नवा मानदंड निर्माण करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाकडे पाहता येईल. शेतकरी आत्महत्या हा भारतातील एक प्रमुख समस्या आहे पण पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायामुळे येथील एकाही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली नाही यावरून निरोगी समाजव्यवस्था आणि शाश्वत अर्थचक्र निर्माण करण्यातील डेअरी उद्योगाचे योगदान लक्षात येते. ७ लाखाहून अधिक शेतकरी आणि हजारो उद्योजकांची यशोगाथा गोकुळ मुळे निर्माण झाली आहे.
ज्या देशाचे कृषी क्षेत्र मजबूत त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत असते. भारतात अर्ध्याहून अधिक जनसंख्या हि कृषी व्यवस्थेवर आधारित आहे. ५ ट्रीलिअन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट समोर ठेवलेले असताना ते साध्य करण्यासाठी भारताला देखील कृषी आणि डेअरी उद्योगाचे महत्व प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे. हजारो वर्षांची परंपरा आणि कृषी संस्कृतीमुळे भारतातील डेअरी उद्योगाचा पाया भक्कम आहे या कारणाने या क्षेत्रात सर्वात जास्त संधी भारताला आहे हे सर्वचजण मान्य करतात. आज २१० मिलिअन मेट्रिक टन उत्पादनामुळे दूध उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर असणाऱ्या देशासमोर येत्या १० वर्षात ३३३ मिलिअन मेट्रिक टन दूध उत्पादनाचे आव्हान आहे. हे दूध जागतिक दर्जाच्या मानांकनाची पूर्तता करणारे, प्रतिजैविके विरहीत असले पाहिजे. याकरिता चांगल्या दर्जाचे वाण निवडणे ते विकसित करणे, अत्युच प्रतीच्या वैरण आणि खाद्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून रोग प्रतिकारक क्षमता वाढवणे, वातावरणीय बदलाचा परिणाम दूध उत्पादनावर होऊ नये म्हणून कृत्रिम उपाययोजना करणे, लम्पी सारख्या अचानक पणे उदभनाऱ्या आजारांना आणि नैसर्गिक संकटाना तोंड देण्यासाठी प्रभावी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा उभी करणे. पशुधनाचे डिजिटल ओळखपत्र तयार करणे, बॅलन्स डेअरी इको सिस्टीम निर्माण करणे, या साखळीतील प्रत्येक घटकापासून मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती करत अधिक नफ्याचे गणित साध्य करणे.अशी आव्हाने आपल्याला समर्थपणे पेलावी लागतील. यासाठी इथून पुढच्या काळात शासन, प्रशासन आणि याक्षेत्राशी निगडीत सर्व घटकांनी एकत्र येऊन दीर्घकालीन कृती आराखडा आणि डेअरी क्षेत्राच्या विकासासाठी पोषक धोरणे आखण्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नव्या तरुण पिढीला या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी व्यवसायिक दृष्टीकोनातून या व्यवसायातील कौशल्ये आणि व्यवस्थापनाचा विकास करणे याची गरज आहे. तरच हि शाश्वत अर्थव्यवस्था कोणत्याही जागतिक स्पर्धेला समर्थपणे तोंड देऊ शकेल.
यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या सचिव वर्षा जोशी, एन.डी.डी.बी.चे टीम लीडर नरेंद्र कराडे, रिजर्व बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक सतीश मराठे, मारुती सुझुकी चे संचालक केंचुरो टोयोफुको, नेदरलँड मधील जागतिक अभ्यासक अलार्ड एस्लिंक यांच्यासह डेअरी उद्योगातील तज्ञ उपस्थित होते.