
मुंबई : अग्निपथ योजना ही संरक्षण दलांना प्रबळ करण्यासाठी व भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यास समर्थ करण्यासाठी या दलांत स्थित्यंतर घडवणारी योजना ठरेल,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

तिन्ही सशस्त्र दलांत अल्पकालीन सेवेसाठी भरतीची योजना असलेल्या ‘अग्निपथ’च्या पहिल्या तुकडीच्या ‘अग्निवीर’ जवानांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधताना मोदी बोलत होते.पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार मोदी यांनी सोमवारी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे अभिनंदन केले. या पथदर्शक योजनेत सहभागी झाल्याबद्दल मोदींनी अग्निवीरांची प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या. ही योजना महिलांना सक्षम करेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, की युवा अग्निवीर सशस्त्र दलांना अधिक तरुण व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ‘तंत्रस्नेही’ बनवतील. विशेषत: सध्याच्या तरुण पिढीमध्ये ही क्षमता आहे. सशस्त्र दलांत तांत्रिकदृष्टय़ा अद्ययावत असलेले सैनिक महत्त्वाची भूमिका बजावतील.पंतप्रधान म्हणाले की, ‘नव्या भारता’त नवा जोश आहे. सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासह त्यांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकविसाव्या शतकातील बदलत्या युद्धतंत्रांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष युद्धाच्या नव्या कक्षा व ‘सायबर’ युद्धाच्या आव्हानांवरही विवेचन केले. अग्निवीरांच्या क्षमतेचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांची भावना व दृढसंकल्पामध्ये सशस्त्र दलांचे शौर्य प्रतिबिंबित होते. आपल्या संरक्षण दलांनी देशाचा राष्ट्रध्वज आपल्या शौर्याने नेहमीच दिमाखात उंच फडकत ठेवला आहे.
