दलित तरूणीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ दोषींना तात्काळ अटक करा ; चर्मकार संघटनेची मागणी

धामोड (प्रतिनिधी) : मौजे पडळी (ता.राधानगरी) येथील दलित समाजातील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी राधानगरी तालुका समस्त चर्मकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कोल्हापूर, तहसीलदार व पोलीस निरीक्षक राधानगरी यांना निवेदन देण्यात आले.

अधिक माहिती अशी, मंगळवार दि.२७ रोजी मारुती कारमधून पळवून नेऊन फेजिवडे-दाजीपूर रस्त्यावर बलात्कार केल्याची फिर्याद पडळी (ता. राधानगरी) येथील युवतीने राधानगरी पोलिस ठाण्यात दिली आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरणी अमोल रंगराव व्हरकट (वय ३० रा. पडळी) व अनुज बळवंत गोठणकर (वय २२, रा.राधानगरी) यांच्यावर कलम ३७६/१, ३६६, ३५४ ब व अॅट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी अमोल व्हरकट व अनुज गोठणकर यांना मंगळवारी रात्रीच अटक केली आहे. पिडीत युवती खाजगी नोकरी करते. तिला पडळी गावातून अमोल व अनुज यांनी मारुती कारमधून पळवून नेले. नंतर अमोलने जबरदस्ती केली. याबाबत कोठे वाच्यता केल्यास तुझ्यासह तुझ्या कुटुंबाला संपविण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलीस उपअधिक्षक अनिल कदम अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *