सांगली : हळदीच्या व्यापारावर पाच टक्के जीएसटी लागू केल्यानंतर सांगलीच्या बाजारात गेल्या आठवडय़ात उतरलेल्या हळदीच्या दराने क्विंटलमागे तब्बल ३ हजार ८५० रुपयांची उसळी घेतली आहे. सौद्यामध्ये हळदीला १८ हजार रुपयांचा सर्वोच्च दर मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले.
हळद शेतमाल नसल्याचा दावा करीत महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणाने डिसेंबरच्या अंतिम आठवडय़ामध्ये जाहीर केला होता. यामुळे धास्तावलेल्या बाजारात हळदीचे दर क्विंटलमागे तब्बल अठराशे रुपयाने खाली उतरले होते. गेल्या आठ दिवसांत हळदीचे दर स्थिर राहिले असले तरी कमीच होते. मात्र, गेल्या हंगामातील हळद विक्री अंतिम टप्प्यात आली असताना आणि नवीन हंगामातील हळद आणखी दोन आठवडय़ांनी बाजारात येण्याची चिन्हे दिसत असल्याने बुधवारी झालेल्या सौद्यामध्ये हळदीची मागणी एकदम वाढली.