पंखा तुटून डोक्यात लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी): करवीर तालुक्यातील खाटांगळे पैकी सडोलकरवाडी येथे भात पिकाला वारे देत असताना पंख्याचे पाते तुटून डोक्यात घुसल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सौरभ सर्जेराव खाडे (वय २५ रा. खाटांगळेपैकी, सोडलकरवाडी) असे त्यांचे नाव आहे.

ग्रामीण भागात भात कापणी सुरू आहे. खाडे यांच्या शेतात रोटाव्हेटर (छोटा ट्रॅक्टर) ला पट्टा जोडून फॅन लावला होता. सौरभ आणि त्यांच्या नातलग भाताला वारे देत होते. भात वारे देत असताना सौरभ वाकला होता. यावेळी अचानक फॅनचे पाते तुटून वेगाने सौरभच्या कानाच्या मागे घुसले. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. मोठा प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याला ताबडतोब सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. करवीर पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद झाली आहे.

फॅनच्या पात्याचे नट बोल्ट सैल झाल्याने आणि रोटाव्हेटरचा वेग प्रचंड असल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सौरभ तब्येतीने दणकट होता. तो होमगार्डमध्ये भरती झाला असून गेले सहा महिने तो करवीर पोलिस ठाण्यात बंदोबस्तास होता. बंदोबस्तातून वेळ मिळेल तशी शेतीची कामे करत होता. पण त्याच्यावर ओढवलेल्या दुर्दवी घटनेमुळे खाटांगळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *