दलित समाजातील तरुणांसाठी व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा सुरु करणार : समरजित घाटगे

कागल (प्रतिनिधी): राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला  मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भरीव कार्य केले आहे. त्यांचाच वारसा पुढे चालवीत दलित समाजातील तरुणांना उद्योजक बनवून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) आणि शाहू समूह एकत्र येणार असून त्यासाठीचा सामंजस्य करार पूर्ण झाला आहे. दिवाळीनंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कागलमध्ये आम्ही व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिली.

डिक्कीचे संस्थापक पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे स्वतः या याबाबतचे मार्गदर्शन करणार आहेत. याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

पुढे बोलताना घाटगे म्हणाले, बहुजन समाजातील तरुणांना उद्योग-व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येऊन काम करूया, असा प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच शाहू समुहातर्फे मी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) समोर ठेवला होता. त्यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत एकत्र काम करण्याचे कबूल केले होते. त्याबाबतचा सामंजस्य करार नुकताच पूर्ण झाला. आता इथून पुढे पश्चिम महाराष्ट्रातील बहुजन समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) आणि शाहू समूह एकत्रितपणे काम करणार आहोत.

बहुजन समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आणि समाजाचा विकास करण्याचे व्रत माझे पणजोबा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हाती घेतले होते. त्यानंतर माझे वडील स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यासाठी खर्ची घातले. आणि आता त्यांचाच वारसा पुढे चालवत शाहू समूहाच्या माध्यमातून मी हे एक मोठे पाऊल उचलत आहे.यामध्ये जास्तीत जास्त दलित समाज बांधव  सक्षम व स्वावलंबी झाले पाहिजेत हाच मुख्य उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *