स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये स्वच्छतेचा बहुमान मिळविण्याची जिल्हयाला पुन्हा संधी- अध्यक्ष राहुल पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) :स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत सन 2021-22 या वर्षात राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण सुरू होत आहे. कोल्हापूर जिल्हयाला स्वच्छतेचा बहूमान मिळवून देण्याची संधी प्राप्त झाली असून सर्वेक्षणांतर्गत सर्व गुण प्राप्त करून घेण्यासाठी सर्व सरपंच, ग्रामपंचायती व ग्रामस्थ यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 अंतर्गत केंद्र स्तरावरून IPSOS Research Pvt Ltd या संस्थेमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी एकूण गुण 1000 निश्चित करण्यात आले असून, हे सर्वेक्षण 3 घटकांतर्गत केले जाणार आहे. यामध्ये सेवा स्तरावरील प्रगती -350 गुण, थेट निरीक्षण -300 गुण, नागरिकांचा प्रतिसाद -350 गुण. असे गुणांकन निर्धारित केले आहे.

या सर्वेक्षणामध्ये केंद्रीय समितीमार्फत थेट निरीक्षणाव्दारे गावाच्या स्वच्छतेची पाहणी करून गुणांकन दिले जाणार आहे. यासाठी गावस्तरावर स्वच्छतेची आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करणेबाबत संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्राम पंचायतींना सूचना दिल्या आहेत.

यासाठी ग्राम पंचायत स्तरावरील कर्मचारी, तरूण मंडळे, महिला व ग्रामस्थ यांच्या सहभागाने परिसर स्वच्छता, गटर्स सफाई, रस्ते,गल्ली व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करावी. तसेच, सार्वजनिक शौचालय व संस्थात्मक स्तरावरील कार्यालयांची स्वच्छता, मंदिर, बाजारपेठ परिसर, खुली मैदाने यांची देखील स्वच्छता करणे आवश्यक आहे. यासोबतचं गावामध्ये स्वच्छता संदेशांचे लेखन करणे आणि स्वच्छतेविषयी जनजागृतीपर उपक्रम राबविणे आवश्यक आहे.

शाश्वत स्वच्छतेअंतर्गत गावातील कुटुंबातील सर्व सदस्यांनी शौचालयाचा नियमित वापर करणे, हात धुण्याची सवय असणे, घरगुती स्तरावरील घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, मासिक पाळी व्यवस्थापन अशा स्वच्छताविषयक सवयींबाबत ग्रामस्थांना माहिती असणे आवश्यक आहे. तसेच गावस्तरावर कच-याचे वर्गीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टीक कचरा व्यवस्थापन यांचे नियोजन करणे गरजेचे आहे.

नागरिकांचा प्रतिसाद अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण – 2021 अंतर्गत लोकांकडून जास्तीत जास्त प्रतिसाद नोंदविण्यासाठी Google Play Store वरून SSG 2021 या ॲपव्दारे तसेच Swachh Survekshan Grameen 2021 (ssg2021.in) या लिंकव्दारे सकारात्मक प्रतिसाद नोंदविणे आवश्यक आहे. स्मार्टफोनव्दारे खालीलप्रमाणे प्रतिसाद नोंदविता येतील.असा नोंदवा कोल्हापूर जिल्हयासाठी प्रतिसाद Google Play Store वरून SSG 2021 ॲप डाउनलोड करा भाषा निवडाआपली प्राथमिक माहिती भरा (नाव, मो. क्रमांक, लिंग, वय) महाराष्ट्र राज्य निवडा कोल्हापूर जिल्हा निवडा स्वच्छतेसंबंधी विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरे द्या.

गावातील ज्या व्यक्ती या सर्वेक्षणांतर्गत आपले मत नोंदवू इच्छितात मात्र स्मार्टफोन उपलब्ध नाही अशा ग्रामस्थांनी स्मार्टफोन वापरणा-या व्यक्तीच्या मोबाईलवर आपला मोबाईल क्रमांक प्रविष्ठ करून आपला अभिप्राय नोंदवू शकतात. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्हयामध्ये स्वच्छता राखण्यास, तसेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रा. 2021 च्या पडताळणी वेळी आवश्यक गुण प्राप्त घेण्यासाठी आणि जिल्हयास स्वच्छतेचा बहुमान प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी प्रतिसाद नोंदवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *