पिंपळगाव येथील गायरान प्लॉटधारकांच्या नावे जमिनी करा : आ.प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी): भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथील ४४ प्लॉटधारकांना गायरान गट नं.१९२ मधील मंजूर झालेली जमीन अद्याप त्यांचे नावे झालेल्या नसून सदर प्लॉटधारकांच्या नावे जमीनी करण्यासाठी भुदरगड-आजराच्या प्रांताधिकारी यांच्यासमवेत तहसील कार्यालय, भुदरगड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तात्काळ ४४ प्लॉटधारकांचे नावे जमिनी करून उर्वरीत प्लॉटधारकांना जमिनी उपलब्ध करून देणेबाबत सुचना करण्यात आली.


गेले अनेक वर्षे रेंगाळत राहिलेला पिंपळगांव येथील गायरानमधील ४४ प्लॉटधारकांचा विषय न्यायालयीन प्रक्रियेने प्रलंबित झाला होता.या प्रकरणाचा निकाल या प्लॉटधारकांच्या बाजूने लागल्याने आमदार प्रकाश आबिटकर यांनी याविषयी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून लवकरच प्रांताधिकाऱ्यासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.


सन १९९० मध्ये पिंपळगांव येथील गावचे क्षेत्र अपुरे पडत असल्याने गावठाण विस्तारासाठी गावातील गरजू लोकांना घरासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम अंतर्गत शासकिय योजनेमधून गावच्या गायरानमधील जागेवर प्लॉट पाडून जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार ,मंडल अधिकारी यांनी गावाशेजारील गायरान असलेल्या गट नं.१९२ मधील जागेत एकूण रितसर ४४ प्लॉट मंजूर करून वाटप करण्यात आले.

त्यावेळी सन १९९० मध्ये प्लॉट मंजूर झालेल्या ४४ जणांकडून शासकीय किंमत म्हणून प्रत्येकी चारशे रुपयेप्रमाणे पैसे जमा करून त्याची रीतसर पावतीही देण्यात आली .तेंव्हा प्लॉटधारकाना पाणी ,दिवाबत्ती यांची सोय करण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयेप्रमाणे ग्रामपंचायतकडूनही पैसे जमा करून घेतले आहेत.त्यावेळी एका ग्रामस्थाने आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली.न्यायालयाचा निकालथा काय लागेल या भितीपोटी अनेकांनी प्लॉट मंजूर होऊनही येथे घरे बांधणे टाळले. यातील आठ लाभार्थ्यांनीच घरे बांधली.त्यांची घरे ग्रामपंचायतकडून नावावर झाली तर ३६ जणांनी घरे बांधलेली नाहीत.आता न्यायालयाचा निकाल या प्लॉटधारकांच्या बाजूने लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.सदरचे मंजूर प्लॉट सातबारा पत्रकी नोंद होऊन कब्जापट्टी मिळावी याबाबत गेली दोन वर्षांपासून प्लॉटधारकांकडून महसूल विभागाकडे रितसर पाठपुरावा करण्यात येत आहे.

यावेळी प्रांताधिकारी श्रीमती बारवे, तहसीलदार अश्विनी आडसूळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी उपसभापती सुनिल निंबाळकर, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, संग्रामसिंह सावंत,विद्याधर परीट, तानाजी जाधव यांच्यासह प्लॉटधारक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *