अरुण नरके गटाकडून जिल्हा बँकेत प्रतिनिधित्वाची मागणी;चार तालुक्यातील कार्यकर्त्यांची एकजूट

कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जसजशी जवळ येईल तशी जिल्ह्यातील विविध गटातून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अरुण नरके गटाकडून संदीप किंवा चेतन नरके  यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रतिनिधित्व करावे यासाठी मागणी जोर धरत आहे. यासाठी अरुण नरके गटाचे प्रमुख कार्यकर्ते जिल्ह्यातील नेत्यांना भेटून बँकेतील प्रतिनिधित्वासाठी मागणी करणार असल्याचे बोलले जाते. तसेच त्यादृष्टीने मेळावा घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. नामदार हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे कार्यकर्ते मागणी करणार आहेत.

पन्हाळा, गगनबावडा, शाहुवाडीसह करवीर तालुक्यात अरुण नरके गटाची मोठी ताकद आहे. स्वर्गीय डी.सी.नरके आणि त्यानंतर अरुण नरके यांनी मागील ५०-६० वर्षात सहकार,शिक्षण आणि समाजकारणाच्या माध्यमातून गावागावात कार्यकर्ते निर्माण केले आहेत.गावागावात सहकारी संस्था उभ्या करून सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. भागातील ७० सेवा संस्था, २२५ दूध संस्था, ५० मार्केटिंग संस्था यांसह इतर ४० सहकारी संस्था या अरुण नरके गटाकडे आहेत. अरुण नरके यांनी अलीकडे सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.

पन्हाळा तालुक्यातील विकास सेवा संस्था, तसेच दूध संस्था या अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली उभारल्या गेल्या आहेत. त्यांनी गोकूळ मध्ये ४५ वर्ष तसेच जिल्हा बँकेत २० वर्ष नेतृत्व केलं आहे. त्यांचा मुलगा चेतन हा उच्च विध्याविभूषित आणि आशियातील नामवंत अर्थतज्ञ आहे. ते सध्या गोकुळ दूध संघाचे संचालक आहेत आणि युथ बँकेच्या माध्यमातून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. संदीप नरके यांनी यापूर्वी जिल्हा बँकेचे संचालक पद आणि मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष पद भूषवले आहे. ते सध्या यशवंत संघाचे अध्यक्ष आहेत. यामुळे अरुण नरके गटाच्या विविध संस्था, प्रमुख आणि सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्यातून जिल्हा बँकेत प्रतिनिधित्वाची  मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *