शाहू साखरच्या कुस्ती स्पर्धेत पै.किरण पाटील तर महिला कुस्ती पट्टू अंकिता शिंदे प्रथम क्रमांकाचे मानकरी

कागल (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या खुल्या गटात ‘शाहू’च्या पै. किरण पाटील याने आणूर च्या अभिषेक कापडे याच्यावर तर महिलांत मुरगूडच्या अंकिता शिंदे हिने बंगले च्या माधुरी चव्हाण वर लीलया मत करून प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, जेष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, संचालक बॉबी माने, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले.

कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे कुस्ती स्पर्धा बंद होत्या. मात्र राज्यात प्रथमच शाहू साखर कारखान्याने या मॅटवरील कुस्ती स्पर्धा विना प्रेक्षक भरविल्या. महिला व पुरुष यांच्या विविध 31 गटांमध्ये या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एकूण सातशे मल्लांनी भाग घेतला.त्यामध्ये विशेष म्हणजे कागल तालुक्यातील 36 महिला मल्लांचा समावेश होता.महाराष्ट्र राज्याच्या सहकारी साखर कारखानदारीत महिला गटात पहिल्यांदा ही स्पर्धा आयोजनाचा मानसुद्धा शाहू कारखान्याने मिळविला. कुस्ती हेच जीवन व राजे समरजितसिंह घाटगे या यूट्यूब चैनलवरून कुस्ती शौकिनांना पाहण्यासाठी थेट प्रसारण करण्यात आले होते.

भारतासह पाकिस्तान,अमेरिका, सौदी अरेबिया, कॅनडा, इटली,कुवेत, नेपाळ, कतार, जर्मनी, ग्रीस आदी अठरा देशातील कुस्ती शौकिनांनी ऑनलाइन पद्धतीने ही स्पर्धा पाहिली. या संपूर्ण स्पर्धेचे संयोजन टोकियो ऑलम्पिक 2020 या स्पर्धेच्या धर्तीवर करण्यात आले होते. कुस्ती स्पर्धेवेळी खुल्या गटातील पुरूष व महिला विभागात प्रत्येकी एक अशा दोन प्रदर्शनीय कुस्त्या आयोजित केल्या होत्या.

प्रदर्शनिय कुस्ती स्पर्धेतपंजाबच्या बाल पंजाब केसरी पै जसपूर्ण सिंह याने पुणे अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा राष्ट्रीय चॅम्पियन पै.गणेश जगताप याला गुणांवर एकतर्फी मात दिली.तर शाहू साखर कारखान्याची मानधनधारक सृष्टी भोसले हिने तिच्यापेक्षा तुलनेत भारी असलेल्या अहमदनगरच्या पल्लवी खेडकर हिला सिंगल निल्सन डावावर दहाव्या मिनिटाला चित्रपट करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

कुमार विभागात धीरज डाफळे( पिंपळगाव), प्रतीक पाटील (पाचगाव), यशवर्धन पवार (बिद्री), सोहम कुंभार (शाहू साखर) रोहित येरूडकर(पिंपळगाव बुद्रुक), रोहित पाटील (बानगे), प्रथमेश साळोखे( शाहू साखर) सनी रानमाळे (इस्पुर्ली) यांनी विविध वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला.

ज्युनिअर विभागात विजय निकम (शेंडूर), किरण चौगुले (नंदगाव), कार्तिक चौगुले (कोगील बुद्रुक), सतीश कुंभार (आनुर), सुरज पालकर (शाहू साखर), अमित साळवी (बानगे),शुभम चव्हाण (शाहू साखर), अनिल पाटील (शाहू साखर),सुदर्शन पाटील (हदनाळ), अनिकेत हवलदार (दिंडनेर्ली), निलेश हिरूगडे (शाहू साखर), यांनी विविध वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. महिला कुस्ती विभागात गौरी पाटील (मुरगूड) स्नेहा चौगुले मुरगूड यांनी 45 व 55 किलो गटात प्रथम क्रमांक पटकाविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *