‘या’ महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता? मुलांची काळजी घेण्याचा सल्ला !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने तयार केलेल्या अहवालानुसार भारतात ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने एक अहवाल तयार केला आहे. ज्यात ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

या अहवालात तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांबाबत अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर देशात लसीकरणाचा वेग आणखी वाढवला नाही तर तिसऱ्या लाटेत संक्रमित लोकांची संख्या दररोज ६ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

हा अहवाल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने तज्ज्ञांशी बोलल्यानंतर तयार केला आहे आणि त्यात कोरोनाच्या प्रसाराशी संबंधित पैलू आणि प्रतिबंधक उपायांबद्दल सांगण्यात आलं आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांबद्दल अधिक काळजी घेण्याची गरज आहे आणि मुलांना प्राधान्याने लस लागू करण्यावर भर द्यावा लागेल, असं अहवालात म्हटलं आहे.

तसंच इतर आजारांनी ग्रस्त मुलांना प्राधान्य द्यावं लागेल. तसेच शिक्षक, शालेय कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक करावे लागेल, असंही सांगण्यात आलं आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी रुग्णालयानं अलर्ट मोडमध्ये असावं असंही अहवालात आहे. यामध्ये असे म्हटले आहे की जर मुलाला संसर्ग झाला असेल तर पालकांची रुग्णालयात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. या अहवालात मुलांचं लसीकरण करताना घ्यावयाच्या अतिरिक्त खबरदारीचा सल्लाही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *