येणाऱ्या 6 ते 8 आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट : डॉ. रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशात येणाऱ्या 6 ते 8 आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट येणार असून ती येणे अटळ आहे, असा इशारा ‘एम्स’चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. कडक निर्बंधांनंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना शनिवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. गुलेरिया यांनी, जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण हाच एक मार्ग असल्याचेही स्पष्ट केले. अवाढव्य लोकसंख्येचे लसीकरण एक आव्हान असून ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याशिवाय तूर्त ते पेलता येणार नाही, असा मार्गही त्यांनी सुचविला.

अनलॉक होत असताना लोक कोरोनासंबंधित सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहेत. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेपासूनही आपण काही बोध घेतलेला दिसत नाही. गर्दी होतेच आहे, लोक एकत्र येतच आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय स्तरावर रुग्णसंख्या पूर्ववत वाढीला लागण्यास वेळ जावा लागेल. तिसरी लाट थोडी लांबू शकते; पण ती अपरिहार्य आहे. गर्दी रोखण्यात, नियमपालनात काय भूमिका आपण घेतो, यावर बरेच काही अवलंबून असेल.

बाहेरून आलेला नवा विषाणू आता येथे विकसित झाला आहे. हा विषाणू सतत बदलत राहणार आहे. पाच टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या भागात मिनी लॉकडाऊन अपरिहार्य करावाच लागेल. लसीकरण पूर्ण होत नाही तोवर आपण असुरक्षित आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *