अन्यथा.. पंचगंगा नदीमध्ये जलसमाधी :दलित महासंघ

करवीर ( प्रतिनिधी ) उंचगाव,  वळीवडे हद्दीतून जाणाऱ्या ओढ्यावरील अतिक्रमनावर कारवाई करावी. अन्यथा दलित महासंघाचे कार्यकर्ते पंचगंगा नदीमध्ये जलसमाधी घेतील, असा इशारा दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.


उंचगाव, गडमुडशिंगी, वळीवडे आणि गांधीनगर येथील सांडपाणी निचरा होण्यासाठी मोठा ओढा वाहत होता. पण त्यावर अतिक्रमण झाल्याने त्याला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी निचरा होत नसल्याने गांधीनगर मुख्य रस्त्यासह अन्य अंतर्गत रस्त्यांवर पाणी येते. महापुरामध्ये येथील अवस्था दयनीय बनते. उंचगाव आणि वळीवडेच्या हद्दीत या ओढ्यावर सध्या आणि यापूर्वी अतिक्रमण झाले आहे. ओढ्यावर बांधकाम सुरू असताना नेहमीप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीने दुर्लक्ष का केले, असा सवाल उपस्थित करून आप्पासाहेब कांबळे म्हणाले , वारंवार ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती व तहसील कार्यालयाला निवेदन देऊनसुद्धा प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे सांगितले.
तर पावसाळा सुरू झाला असून या अतिक्रमणामुळे महापुराचे पाणी रस्त्यांवर येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून महापुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. म्हणून पावसाळ्यापूर्वी ओढ्यावरील अतिक्रमणे काढण्यात यावीत. सध्या उंचगाव आणि वळीवडे हद्दीत या ओढ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. या अतिक्रमणासह सरसकट अतिक्रमणे येत्या दहा दिवसात प्रशासनाने काढावीत, अन्यथा पंचगंगा नदीच्या महापुरात बुडण्यापेक्षा तत्पूर्वीच जलसमाधी घेऊ, असा इशाराही राजू कांबळे यांनी दिला.
या पत्रकार परिषदेस निखिल पवार, वीरेंद्र भोपळे, अनिल हेगडे, महेश कांबळे, सचिन शिर्के उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *