मराठा समाजातील २१८५ तरूणांचे भवितव्य धोक्यात!

नियुक्ती रखडलेल्या मराठा विद्यार्थ्यांनी राजे समरजितसिंह घाटगे यांच्यासमोर मांडल्या व्यथा

कागल (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर  एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या परंतु अद्याप नियुक्तीपत्र न मिळालेल्या  विद्यार्थ्यांनी   आपल्या व्यथा  आरक्षणाचे जनक राजर्षि  छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज, शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्यासमोर ऑनलाइन झालेल्या मिटिंग मध्ये मांडल्या. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी घाटगे यांनी पुढाकार घ्यावा असे साकडे या विद्यार्थ्यांनी घाटगे यांना घातले.

राज्यभरातून पाचशेहून अधिक विद्यार्थी या ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभागी झाले होते. राज्यात २०१८ पासून स्पर्धा परीक्षा घेऊन विविध क्षेत्रात भरती प्रक्रिया राबवली. त्यावेळी मराठा आरक्षण कायद्यानुसार एस ई बी सी च्या सवलती या उमेदवारांना होत्या. मात्र हा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर आता ईडब्ल्यूएस दहा टक्के  आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे तीन टक्के  विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. ते ज्या पदासाठी निवडले आहेत त्या पदावर त्यांची नेमणूक होऊ शकत नाही. काहींच्या नियुक्तीबाबत कोर्टाने आदेश देऊनसुद्धा झालेल्या नाहीत.हा मराठा समाजातील तरुणांवर अन्याय आहे. त्यामुळे मराठा समाजातील २१८५ तरूणांचे भवितव्य धोक्यात आहे. त्यांना तातडीने नियुक्ती पत्रे देणे आवश्यक आहे अशा भावना  अनेक विद्यार्थ्यानी व्यक्त केल्या .

 या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार….

समरजितसिंह घाटगे  म्हणाले ,     एमपीएससीसह स्पर्धा परीक्षेद्वारे निवड झालेल्या तरुणांच्या व्यथा मी जाणून घेतल्या. ज्यांची निवड झाली आहे. आणि नियुक्ती रखडली आहे.त्यांना तातडीने नियुक्तीपत्रे राज्य शासनाने द्यावीत. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. याची मला एक सीए म्हणून  जाणीव आहे. त्यामुळे  राजकारणापलीकडे जाऊन मराठा समाजाचा घटक म्हणून मी या विद्यार्थ्यांच्यासोबत ठामपणे उभा  राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *