एमपीएसी ची परीक्षा ठरलेल्या तारखेलाच , आयोगाची स्पष्ट भूमिका

मुंबई(प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंगळवारी आपली भूमिका जाहीर करत ठरलेल्या तारखेला म्हणजे 11 ऑक्टोबरलाच पूर्व परीक्षा होणार असल्याचं स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसारच ही परीक्षा होणार असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. परीक्षा आणि भरती दोन्ही शासनाच्या निर्णयानुसार होणार आहेत असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे. काही मराठा संघटनांनी MPSCच्या परीक्षांना विरोध केला होता.

जोपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा तुटत नाही तोपर्यंत परीक्षा स्थगित ठेवण्याची मागणी काही मराठा संघटनांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

देशातील अनेक राज्यांनी 50 टक्या पेक्षा अधिकचं आरक्षण दिलं आहे, सुप्रीम कोर्टाने आजपर्यंत कुठल्याही प्रकरणात स्थगिती दिलेली नाही. फक्त महाराष्ट्रासाठी वेगळा निर्णय का घेतला गेलाय, याचं कारण शोधलं गेलं पाहिजे, अशा प्रतिक्रिया मराठा आंदोलकांकडून येत आहेत.

2018 तत्कालीन महाराष्ट्र सरकारने कायदा करून मराठा आरक्षण आणलं होतं. त्यानुसार शिक्षण संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती.

या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने कायदा घटनेनुसारच असल्याचं सांगत आरक्षण कायम ठेवलं पण 16 टक्के ऐवजी कमी कोटा असावा, असं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *